रेबीजमुळे म्हैस गेली अन् तेराव्याला जेवलेल्या गावकऱ्यांची तंतरली; 200 लोक रुग्णालयात, नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. पिपरौल गावात एका म्हशीचा रेबीजने मृत्यू झाला आणि अख्खे गाव रुग्णालयात पोहोचले.

काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने म्हशीला रेबीजची लागण झाली होती. दरम्यानच्या काळात याच म्हशीच्या दुधापासून बनवलेला पदार्थ एका जेवणावळीत ग्रामस्थांनी सेवन केला होता. त्यामुळे संसर्गाच्या भीतीने गावकऱ्यांच्या पायालाखची वाळू सरकली आणि 200 हून अधिक गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली.

नेमके प्रकरण काय?

पिपरौल गावात 23 डिसेंबर रोजी एका ‘तेराव्या’च्या विधीनिमित्त सामुदायिक जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी म्हशीच्या दुधापासून बनवलेला रायता मोठ्या प्रमाणावर वाढण्यात आला होता. गावातील बहुतांश लोकांनी या अन्नाचे सेवन केले. मात्र, यानंतर काही दिवसांनी असे लक्षात आले की, ज्या म्हशीचे दूध रायत्यासाठी वापरले होते, तिला काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने चावा घेतला होता. 26 डिसेंबर रोजी या म्हशीमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली आणि तिचा मृत्यू झाला. म्हशीचा मृत्यू रेबीजने झाल्याचे समजताच गावात एकच खळबळ उडाली आणि ज्यांनी रायता खाल्ला होता, त्यांच्यात भीती पसरली.

आरोग्य केंद्रावर ग्रामस्थांची गर्दी

शनिवारी उजानी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रावर (CHC) लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिला, पुरुष आणि तरुणांचा मोठ्या संख्येने समावेश होता. स्थानिक रहिवासी जशोदा यांनी सांगितले की, “पूर्ण गावाने तेराव्याला रायता खाल्ला होता, त्यामुळे आता प्रत्येक जण घाबहरेला आहे. तर धर्मपाल या ग्रामस्थाने सांगितले की, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे म्हैस पिसाळली होती, त्यामुळे आम्ही आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

आरोग्य विभागाची भूमिका

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. रामेश्वर मिश्रा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ग्रामस्थांना रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला दिला आहे. रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध करणे केव्हाही चांगले. उकळलेले दूध प्यायल्याने रेबीजचा प्रसार होण्याची शक्यता कमी असते, तरीही संशय असल्यास लस घेणे सुरक्षित ठरते. लोकांनी भीतीच्या छायेत जगण्यापेक्षा नखबरदारी घेतलेली केव्हाही चांगली. सध्या गावात कोणालाही कोणतीही बाधा झाल्याचे वृत्त नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.