‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता’, शिंदे-विखे कुटुंबामध्ये वाकयुद्ध रंगले

14359

‘राम शिंदेचा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे व जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले आहे. सर्व पदे मी भोगली आहेत. पक्षाचेही योगदान त्यामध्ये आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये’, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलल होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते.

भाजप उमेदवारांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. यावर विचारले असता राम शिंदे म्हणाले की, माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. आम्ही कर्तुत्वाने पुढे आलो आहोत. जनतेने आम्हाला निवडून दिले. आम्हाला जनाधार होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला चॅलेंज देण्याचे काहीच कारण नाही आणि त्यांनी देऊही नये.

ram-shinde

आमचा पराभव झाला, या संदर्भामध्ये पक्षाने वरिष्ठ पातळीवर समिती नेमलेली आहे. ते त्याचा अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच, असे शिंदे यांनी सांगून आमच्यामध्ये कोणताही समेट झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती दिली. कुणीही पराभवासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणूक लढवतो. त्यामुळे अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे – शिंदे
नगर जिल्हा विभाजनाचा विषय मी ज्या पद्धतीने हाती घेतला, तो आगामी काळामध्ये सुद्धा सुरू राहील. जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रही राहणार आहे . आमच्या कार्यकाळात हे विभाजन होऊ शकले नाही, हे जरी खरे असले तरी निवडणुकीच्या तोंडावर 7 जिल्ह्यांचे विभाजन करावे, असा विषय होता. त्यामध्ये नाशिक, बीड, ठाणे आदी जिल्ह्यांचा समावेश होता. निवडणुकीच्या तोंडावर जर विभाजन झाले असते, तर त्याचा वेगळा संदेश गेला असता. त्यामुळे तो विषय प्रलंबित राहिला. जिल्हा विभाजन झाल्यावर नगरचे मुख्यालय हे नगर आहे, उत्तरेचे मुख्यालय कुठे करायचे, हा राज्य शासनाचा विषय आहे. त्याबाबत सरकार निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी देऊन जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रह धरणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या