सर्व्हर क्रॅश, सलमानचा ‘राधे’ अडचणीत; पहिल्याच दिवशी धमाका, दुबईत मात्र थिएटरबाहेर रांगा

ईदच्या मुहूर्तावर अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा बहुचर्चित सिनेमा ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुरुवारी प्रदर्शित झाला. सलमानच्या चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात ‘झी 5’ वर लॉगिन केल्यामुळे या अॅपचा सर्व्हर व्रॅश झाला होता. साधारण तासाभराने अॅप पुन्हा सुरू झाले. तर दुसरीकडे दुबईत ‘राधे’ बघण्यासाठी सिनेमागृहांबाहेर रांगा लागल्या. त्यामुळे पहिल्या दिवशी ‘राधे’चा धमाका बघायला मिळाला.

कोरोनामुळे सलमानच्या ‘राधे’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली. गेल्या वर्षीच ईदच्या दिवशी ‘राधे’ प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र सिनेमागृहे बंद असल्याने तो प्रदर्शित झाला नाही. या वर्षी देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे ‘राधे’ च्या प्रदर्शनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे सिनेमागृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अशा दोन्ही ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला. त्यानुसार दुबईत आज सिनेमागृह चालकांच्या मागणीवरून ईदच्या दिवशी ‘राधे’ प्रदर्शित करण्यात आला. ‘राधे’च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ ला दुबईच्या प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत असल्याचे सिनेमागृहांबाहेरील रांगांवरून दिसत आहे. त्याचबरोबर ओटीटीवरही सलमानच्या चाहत्यांच्या उडय़ा पडल्या आहेत. त्याचवेळी काही युजर्स ‘झी 5 प्रीमियर’वर ‘राधे’ सिनेमा दाखवला जात नसल्याची तक्रार करत आहेत. ज्या लोकांकडे ‘झी 5’ चे सबस्क्रिप्शन आहे त्यांनाही हा सिनेमा बघण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. याबद्दलची नाराजी ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

  • ‘राधे’ सिनेमाचे सर्व स्वामित्व हक्क झी स्टुडिओने खरेदी केले आहेत. यासाठी त्यांनी सुमारे 235 कोटी रुपये मोजले आहेत. झी स्टुडिओने ‘राधे’च्या वितरणाचे, व्हिडीओ स्ट्रीमिंगचे आणि संगीताचे हक्क विकत घेतले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या