समृद्धी महामार्गाच्या जालना ते नांदेडदरम्यानच्या कामासाठी लवकरच अधिसूचना निघणार – राधेश्याम मोपलवार

समृध्दी महामार्गातंर्गत जालना ते नांदेड या आठ पदरी रस्त्याच्या कामासाठी अधिसूचना पुढील आठवड्यात निघणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात राज्याचे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृध्दी महामार्गातंर्गत जालना ते नांदेड या तिसऱ्या टप्प्यातील आठ पदरी रस्त्याला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी 5 हजार 500 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती मोपलवार यांनी यावेळी दिली.

194 किलोमीटरचा हा मार्ग असून तो मुंबईला जेएनपीटीला जोडला जाणार आहे. सुरळीत वाहतूक तसेच वेगवान दळणळवणासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार असून नांदेड ते पाथरी या मार्गावरच्या सध्याच्या परिस्थितीची आपण पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे मराठवाड्यातील अधिकारी देखील उपस्थित होते. या महामार्गाच्या आराखड्याची सध्या वेगाने तयारी सुरु असून, तो लवकरात लवकर तयार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यासाठी मराठवाड्यातील अनेक तज्ज्ञ अधिकारी यासाठी परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी संपादन करण्यासाठी पुढील आठवड्यात नांदेड, जालना, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करतील. त्यानंतर भूसंपादनाच्या कारवाईला प्रारंभ होईल, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या