
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली असून तो आता जेतेपासून दोन पावले दूर आहे. त्याने उपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टजमॅनचा 6-4, 7-5, 6-2 असा पराभव केला. नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने नदालला आता कारकीर्दीतील 19 वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद खुणावत आहे. उपांत्य लढतीत नदालची गाठ इटलीच्या माटियो बेरेटिनी याच्याशी पडणार आहे.
राफेल नदालने कारकीर्दीत 33 व्यांदा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. रॉजर फेडरर (45) व नोवाक जोकोविच (36) यांच्यानंतर ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक वेळा उपांत्य फेरी गाठणारा नदाल तिसरा खेळाडू होय. अमेरिकन ओपनमध्ये आठव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करताना नदालने दोन वेळा उपांत्यपूर्व फेरीत आलेल्या श्वार्टजमॅनवर तीन तासांपर्यंत रंगलेल्या लढतीत सलग आठव्यांदा हरवले. गतवर्षी उपांत्य लढतीत जुआन मार्टिन डेल पोत्रो याच्याविरुद्ध गुडघ्याच्या दुखापतीमुळे 33 वर्षीय नदालला अर्धावर सामना सोडावा लागला होता.
दुसरीकडे 24 व्या मानांकित माटियो बेरेटिनी याने 13 व्या मानांकित फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा चार तासांपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन लढतीत 3-6, 6-3, 6-2, 3-6, 7-6 असा पाच सेटपर्यंत घाम गाळावा लागला. 23 वर्षीय बेरेटिनी हा अमेरिका ओपनची उपांत्य फेरी गाठणारा 42 वर्षांत पहिलाच इटालियन खेळाडू ठरला हे विशेष. त्याआधी 1977 मध्ये इटलीच्या कोराडो बाराजुट्टीने अमेरिका ओपनची उपांत्य फेरी गाठली होती.
कॅनडाची बियंका अंतिम चारमध्ये
कॅनडाच्या 19 वर्षीय बियंका ऍण्ड्रेस्क्यू हिने बेल्जियमच्या एलिसे मर्टन्स हिचअ 3-6, 6-2, 6-3 असा पाडाव करून अमेरिका ओपनच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला. आता उपांत्य लढतीत तिच्यापुढे 13 व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिच हिचे आव्हान असेल. बेनसिचने क्रोएशियाच्या डोना वेकिच हिचा 7-6, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. बियंका आणि बेलिंडा प्रथमच एकमेकींना भिडणार असल्याने ही उपांत्य लढत चुरशीची होईल अशी टेनिसप्रेमींना अपेक्षा आहे.

























































