INDvsAUS कॅच सोडणे महागात पडले, लाबुशेनचे टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा आणि निर्णायक कसोटी सामना शुक्रवारपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू झाला. टीम इंडियाच्या अनुभवहिन गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा उचलला आणि पहिल्या दिवसाखेर 5 बाद 274 धावा उभारल्या. खेळ थांबला तेव्हा कॅमरन ग्रिन 28 आणि कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला 17 धावांवर दोन धक्के बसले. सलामीवीर वॉर्नर 1 आणि हॅरिस 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या लाबुशेन आणि स्मिथ यांच्यात 50 धावांची भागिदारी झाली. वॉशिंग्टन सुंदरने स्मिथला 36 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी संघाला 200 धावंचा टप्पा गाठून दिला.

दोन जीवदान

या दरम्यान, मार्नस लाबुशेन याने कसोटी कारकीर्दीतील पाचवे आणि टीम इंडियाविरुद्धचे पहिले शतक झळकावले. यात टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांनीही त्याला चांगलीच मदत केली. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी त्याचे झेल सोडले. याचा पुरेपुर फायदा उठवत लाबुशेनने शतकी खेळी केली. नटराजनच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने 108 धावा चोपल्या. तत्पूर्वी मॅथ्यू वेड देखील 45 धावा काढून बाद झाला.

नटराजनचे पदार्पण

नशीबाची साथ मिळालेल्या टी. नटराजन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि एक दिवसीय मालिकेत पदार्पण केले होते. त्यानंतर आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटी कारकीर्दीचा शुभारंभ केला. पहिल्या डावात आतापर्यंत त्याने लाबुशेन आणि वेड असे दोन बळी घेतले आहेत.

नवदीप सैनीला दुखापत

बुमराह, शमी, इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या नवदीप सैनी याला दुखापत झाली. मांडीचा स्नायू दुखावल्याने त्याला मैदान सोडावे लागले. तो पुन्हा खेळू शकेल अथवा नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचा फेरा अखेरच्या कसोटीतही संपला नाही असेच दिसते.

चार बदल

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या संघात पाच बदल करण्यात आले. विहारीच्या जागी मयांक अग्रवाल, जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर, आर. अश्विनच्या जागी वाशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहच्या जागी टी. नटराजनला खेळण्याची संधी मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या