गळवंतीला लटकून हजारो भाविकांनी केली नवसपूर्ती, राहात्याचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहात साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहात्याचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठय़ा जल्लोषात साजरी करण्यात आली. ‘बिरोबा महाराज की जय’ असा जयघोष करत निघालेली गळवंतीची (बगाडाची) मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी डफांच्या तालावर मानाच्या काठय़ा नाचवण्यात आल्या. गुलालाची उधळण करण्यात भाविक तल्लीन झाले होते.

राहात्याचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांवर हजारो भाविकांची श्रद्धा आहे. ‘नवसाला पावणारा देव’ अशी ख्याती असलेल्या वीरभद्र महाराजांना हजारो भाविक नवस करत असतात. इच्छापूर्ती झाल्यानंतर गळवंतीला लटकून नवसपूर्ती केली जाते. हत्तीच्या आकारात बनवलेल्या गळवंतीला लटकण्यासाठी हजारो महिला-पुरुषांनी शुक्रवारी रात्रभर गर्दी केली होती. गळवंती रथाला गळी लागून नवसपूर्ती केली जाते. त्यादिवशी पूर्ण दिवस उपवास केला जातो. नवस पूर्ण केल्यावर उपवास सोडला जातो. पहिल्या दिवशी नवनाथ मंदिरासमोर, तर दुसऱया दिवशी वीरभद्र मंदिरासमोर, अशी दोन दिवस नवसपूर्ती होते.

गळवंतीला लटकण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जात आहे. अनेक महिला, पुरुष, उच्चशिक्षित तरुणी यात सहभाग घेत असतात. या यात्रेनिमित्त मंदिर परिसरासह शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून हजारो भाविक देवाला दंडवत घालतात. अभिषेक व सत्यनारायण महापूजा करून प्रसाद म्हणून गुळाची शेरणी भाविकांना वाटली जाते. श्री वीरभद्रला गावातील प्रत्येक घरातून पुरण-पोळीचा नैवेद्य दिला जातो. धनगर समाजाला या यात्रेत मोठा मान असतो. वीरभद्र महाराज यात्रेच्या दिवशी सायंकाळी नवनाथ मंदिरापासून राहाता शहरातील मिरवणुकीच्या मार्गाने गळवंती रथाची मिरवणूक काढण्यात येते. नवस बोललेली दोन बालके स्त्री व पुरुषाच्या वेशात रथाला गळी लावली जातात. यानंतर शहरातून या रथाची भव्य मिरवणूक काढली जाते. यावेळी देवाच्या काठय़ांची महिला भक्तिभावाने पूजा करतात. रथ मंदिरासमोर आल्यानंतर तेथे यात्रेत गळवंती अर्थात बगाडाला लटकून महिला आणि पुरुष आपली नवसपूर्ती करतात.