मनरेगा योजना बंद केल्यामुळे देशातील दोन तीन अब्जाधीशांना फायदा, राहुल गांधी यांची टीका

मनरेगा बंद करणे म्हणजे कोट्यवधी जनतेवर अन्याय आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच यामुळे देशातील दोन तीन अब्जाधीशांना होईल अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी म्हटले की मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय कॅबिनेट आणि राज्य सरकारांना विचार न करता थेट घेण्यात आला असून सध्या “मोदी वन मॅन शो” सुरू आहे आणि मोदी जे करायचे ठरवतात तेच करतात. या निर्णयाचा फायदा दोन–तीन अब्जाधीशांना होत असून त्याचा तोटा ग्रामीण भागाला सोसावा लागत आहे. मनरेगा ही केवळ योजना नव्हती तर हक्कांवर आधारित संकल्पना होती, ज्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना किमान मजुरीची हमी मिळत होती. त्यामुळे मनरेगा बंद करणे म्हणजे हक्कांवर आधारित संकल्पनेवर थेट आघात आहे. हा पैसा राज्यांकडून काढून केंद्राकडे खेचला जात आहे, सत्ता आणि आर्थिक अधिकारांचे संकुचन होत आहे आणि हा निर्णय थेट पंतप्रधान कार्यालयातून घेण्यात आलेला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मनरेगाचे नाव बदलून “VB G RAM G” करण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध जाहीर करत काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना “गांधी” या आडनावाशीच समस्या आहे म्हणूनच मनरेगाचे नाव बदलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरूनही टीका करत ही लोकशाही हक्क कमी करण्याची कट असल्याचे म्हटले आणि गरीब, दलित, आदिवासी व अल्पसंख्याक मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत याची खात्री करण्याचे आवाहन केले. खरगे यांनी सांगितले की सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील टीमने मनरेगा दिली, लाखो कुटुंबांचे पालनपोषण त्यातून झाले, मनरेगा नसती तर लाखो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले असते; मनरेगामधून महात्मा गांधींचे नाव काढणे हा त्यांचा अपमान असून या सरकारला केवळ गांधी कुटुंबच नव्हे तर महात्मा गांधींचे नावही मान्य नाही, “गांधी” या आडनावाशीच सरकारला अडचण आहे, असे ते म्हणाले.