नितीश कुमार आणि भाजपच्या डबल इंजिन सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं, राहुल गांधी यांची टीका

पाटण्यात युवा काँग्रेसने महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण तरुणीं हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या महारोजगार मेळ्यात जमलेली गर्दी ही फक्त गर्दी नव्हे, तर एक स्पष्ट संदेश आहे. बिहारचा तरुण आता केवळ भाषणांवर नाही, तर रोजगारावर आपले भविष्य घडवू इच्छितो असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी भाजप आणि नीतीश कुमार यांच्या डबल इंजिन सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, “या सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे, त्यामुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या शोधासाठी बाहेरच्या राज्या जावं लागतं. या तरुणांना आपलं गाव, आपला परिवार सगळं मागे सोडावं लागतं.”

तसेच “बिहारचे तरुण मेहनती, कष्टकरी, आणि हुशार आहेत. त्यांना फक्त स्थानिक आणि सन्मानजनक रोजगाराची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. आता बदलाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी फक्त आश्वासने नाही, तर उपाय घेऊन आली आहे. आमचा स्पष्ट उद्देश आहे प्रत्येक युवकाला रोजगार, त्याच्या कौशल्याला योग्य संधी, स्थलांतर थांबवणं आणि प्रत्येक कुटुंबाला एकत्र ठेवणं. हाच मार्ग आहे एका समृद्ध बिहारकडे जाण्याचा असेही राहुल गांधी म्हणाले.