चोरी चुपके आता चालणार नाही; जनतेला जाग आलीय! राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा पर्दाफाश केल्यापासून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने मोहीमच उघडली असून लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी वेबसाइट सुरू केली आहे. यासंदर्भातील नवा व्हिडीओ राहुल गांधी यांनी आज ट्विट केला. ‘चोरी चुपके आता चालणार नाही, जनता जागी झाली आहे’, असा इशारा त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिला.

राहुल यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ मतचोरीबद्दल जनजागृती करणारा आहे. ‘एक गरीब माणूस पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी येतो. तिथला पोलीस शिपाई त्याला टाळायचा प्रयत्न करतो. गाय, बैल, म्हैस, सायकल, पैसे, दागिने, बायको… तुझं काय चोरीला गेलंय? असे पोलीस त्याला विचारतो. त्यावर घाबरत घाबरत तो माणूस माझ्या मताची चोरी झालीय असे सांगतो. त्याच्या या उत्तराने पोलीसही खडबडून जागे होतात. त्याला वेडय़ात काढायचा प्रयत्न करतात, पण नंतर ते स्वतःच विचारात पडतात. आपलंही मत चोरी झालं नाही ना, असं एकमेकांना विचारतात. याचवेळी व्होटचोरीविरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं जातं. हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. ’

निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोग उद्या, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मतचोरीच्या आरोपांवरून सध्या आयोग टीकेच्या रडारवर आहे. हरयाणाच्या एका गावातील निवडणुकीची ईव्हीएम मतमोजणी सुप्रीम कोर्टात होऊन निकाल फिरल्याने त्यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

‘एक व्यक्ती, एक मत’ हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे. त्याच्या रक्षणाची लढाई आम्ही सुरू केली आहे. मताधिकार यात्रा घेऊन लोकांमध्ये चाललो आहोत. संविधान वाचवण्यासाठी आमच्यासोबत या!

  • राहुल गांधी हे उद्यापासून 16 दिवस बिहारच्या दौऱयावर जाणार आहेत. उद्या, 17 ऑगस्टपासून ते बिहारमध्ये मत अधिकार यात्रा काढणार आहेत. बिहारच्या 24 जिह्यांत ही यात्रा जाणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हेदेखील यात्रेत सहभागी होतील.