ज्योतिरादित्य यांना घरवापसी करावीच लागेल; राहुल गांधी यांचा दावा

वर्षभरापूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या घरवापसीबाबत सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठाम दावा केला. लिहून घ्या, ते कधीही तेथे मुख्यमंत्री बनणार नाहीत. त्यांना काँग्रेसमध्ये माघारी यावेच लागेल. ते काँगेससोबत असते तर कधीच मुख्यमंत्री झाले असते. भाजपमध्ये त्यांना मागच्या बाकावर बसावे लागतेय, अशा शब्दांत राहुल यांनी ज्योतिरादित्य यांच्या आडून भाजपवर शरसंधान साधले.

राहुल यांनी सोमवारी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ज्योतिरादित्य यांची भाजपमध्ये कशी उपेक्षा झालीय, यावर भाष्य केले. ते म्हणाले, जर त्यांनी वेगळा रस्ता धरला नसता तर ते आज नक्कीच मुख्यमंत्री बनलेले असते. ज्योतिरादित्य काँग्रेसमध्येच राहून मुख्यमंत्री बनू शकले असते. भाजपमध्ये ते मागे राहिले.

आरएसएसच्या विचारधारेविरुद्ध लढायचेय!

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. आपल्याला आरएसएसच्या विचारधारेविरोधात अहिंसक मार्गाने लढायचेय. कोणाला घाबरण्याची गरज नाही, असा सल्ला त्यांनी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. पाच राज्यांत होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पक्षातील युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या