काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात शेवटच्या रांगेत बसवून एनडीए सरकारने पुन्हा एकदा मनाचा कोतेपणा दाखवल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कारण, दहा वर्षे लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. मात्र, राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले तरी त्यांना बसायला मागच्या रांगेत जागा दिल्यामुळे एनडीए सरकारविरोधात देशभरातून जोरदार टीका होत आहे.
राजशिष्टाचार नियम काय सांगतो?
राजशिष्टाचार नियमाप्रमाणे लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला पॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. त्यामुळे त्यांना नेहमी पहिल्या रांगेत बसण्यासाठी जागा दिली जाते. यावेळी पहिल्या रांगेत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेंद्रीय मंत्री शिवराज सिंह, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बसले होते.
सरकारचे थातूरमातूर उत्तर
राहुल गांधी यांना मागे बसण्यासाठी जागा दिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱयांनी एनडीए सरकारला अक्षरशः घेरले. त्यानंतर सरकारने थातूरमातूर उत्तर देत बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पुढची जागा ऑलिम्पिक खेळाडूंसाठी राखीव होती. तसेच सरकारला खेळाडूंचा सत्कार करायचा होता, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संरक्षण खात्याकडून या कार्यक्रमाचे नियोजन केले जात असते. कुणाला कुठे बसण्यास जागा द्यावी याचे सर्व निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेले असतात. भाजपाचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना नेहमी पहिल्या रांगेत आसन दिले जात होते.
स्वातंत्र्य सर्वात मोठे सुरक्षा कवच-राहुल गांधी
आपल्यासाठी स्वातंत्र्य केवळ एक शब्द नाही तर संविधान आणि लोकशाहीच्या मुल्यांमध्ये रुजवलेले आपले सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या एक्सवरून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य ही एक शक्ती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खरे बोलण्याची क्षमता तसेच आपली स्वप्ने पूर्ण करण्याची आकांक्षा आहे, जय हिंद असे राहुल गांधी म्हणाले.
मोदींची संकुचित मनोवृत्ती- काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनोवृत्ती संकुचित असल्याचे आज पुन्हा समोर आले. अशा लोकांकडून अपेक्षाही करायला नको. आज स्वातंत्र्य दिन सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवून मोदींनी त्यांच्या मनात असलेले नैराश्य दाखवले, अशी टीका काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवरून केली आहे. परंतु, राहुल गांधी हे जननायक आहेत. त्यामुळे त्यांना पाचव्या रांगेत बसवा किंवा पन्नासाव्या रांगेत बसवा त्यांना काहीच फरक पडत नाही. ते लोकांचा आवाज संसदेत मांडतच राहातील. मात्र, तुम्ही दाखवलेल्या मानसिकतेतून हेच दिसते की तुमच्या मनात लोकशाही, विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्याबद्दल जराही आदरभाव नाही. केवळ राहुल गांधी यांनाच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही पाचव्या रांगेतच जागा देण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाने उत्तर दिले की ऑलम्पिक खेळाडूंना सन्मान द्यायचा होता. त्यांना सन्मान द्यायलाच हवा, विनेश पह्गाटलाही सन्मान द्या. परंतु, हाच सन्मान अमित शहा, निर्मला सीतारामन, जे पी नड्डा, एस जयशंकर यांना द्यायचा नव्हता का? असा सवाल श्रीनेत यांनी केला आहे. दरम्यान, मोदीजी, 4 जूननंतरच्या वास्तवापासून तुम्ही अद्याप काहीही धडा घेतलेला दिसत नाही. जागे व्हा, असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल सुनावले आहे.