केवळ कौतुक नको; राज्यांना मदत करा, जीएसटीचे पैसे द्या!

2354

कोरोना व्हायरसचा मुकाबला एकजुटीने करावा लागेल. केंद्र सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी राज्यांना मदत करावी. केवळ कौतुक नको. राज्यांना जीएसटीचे पैसे द्या. राज्य सरकारांना जादा अधिकार द्या, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ‘लॉकडाऊन’ हे केवळ पॉज बटन आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशभरात चाचण्या वाढविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपले अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. पण सध्या ती वेळ नाही. सध्याची वेळ एकत्र येण्याची आहे. टीका करण्याची वेळ नाही. एकत्रितपणे कोरोनाशी मुकाबला करू या. कोरोनाच्या लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत. वेळोवेळी सूचना सरकारला आम्ही करत राहू, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारे कोरोनाशी जाँबाजपणे दोन हात करत आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारांचे केवळ कौतुक नको तर केंद्राने आर्थिक मदत केली पाहिजे. राज्यांना जीएसटीचे पैसे द्यावेत, असे राहुल गांधी म्हणाले.

‘कोरोना’शी लढताना जात, धर्म विसरले पाहिजे
लॉकडाऊन हे केवळ ‘पॉज बटन’ आहे. कोरोनाला हरवण्यासाठी चाचण्या मोठय़ा प्रमाणावर वाढविल्या पाहिजेत. त्यासाठी व्यापक धोरण आखले पाहिजे. सध्या देशात 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 199 जणांची कोरोना चाचणी होते. प्रत्येक जिह्यात 350 जणांची चाचणी होते. चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्याची गरज आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. चाचण्यांमुळे कोणालाही हानी पोहचणार नाही. जात, धर्म विसरून सर्वांनी एकत्रीतपणे कोरोनाशी लढले पाहिजे, असे ते म्हणाले.

आर्थिक संकट मोठे
सध्याच्या परिस्थितीत आर्थिक आणि आरोग्य या दोन आघाडय़ावर सरकारला लढावे लागणार आहे. भविष्यात येणारे आर्थिक संकट खूप मोठे असेल. सरकारने गोरगरिबांसाठी दर आठवडय़ाला गहू, तांदूळ, साखर, डाळ दिली पाहिजे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांनाही धान्य द्यावे. गरिबांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचण्याची व्यवस्था केली पाहिज़े तसेच देशात मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची भीती आहे. त्यादृष्टीनेही सरकारने मदतीचे प्रयत्न केले पाहिजे, असे राहुल गांधींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक गोष्टींबाबत मतभेद आहेत. मात्र, सध्या टीका करण्याची वेळ नाही. सध्याची वेळ कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
– राहुल गांधी

आपली प्रतिक्रिया द्या