
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यूरोप दौऱ्यात भाजपवर टीका केली आहे. भाजप जे काही करतोय, त्याचा हिंदुत्वाशी संबंध नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच, यामुळे हिंदुस्थानातील गैरहिंदू समुदायांना असुरक्षित वाटत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
राहुल गांधी हे यूरोप दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी ते पॅरिसच्या सायन्सेस पो यूनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. त्यावेळ गांधी यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, मी गीता वाचली आहे, उपनिषदंही वाचली आहेत, अनेक हिंदू ग्रंथ वाचले आहेत. त्या आधारे मी हे सांगू शकतो की भाजप जे काही करतोय, त्यात काहीही हिंदुत्व नाही. हिंदुस्थानात शीख समुदायासह 20 कोटी लोकांना यामुळे त्रास होत आहे. ही आमच्यासाठी लाजेची गोष्ट आहे. ती त्वरित सुधारायला हवी, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
त्यांनी अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांविषयीही यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील दलित जाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मला असा हिंदुस्थान नकोय, जिथे लोकांसोबत दुर्वर्तन केलं जाईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.