देशातील युवकांचा आवाज दाबू नका ,तुम्हाला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल – राहुल गांधी

791

केंद्र सरकारच्या काही निर्णयांविरोधात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठांसह अन्य विश्वविद्यालयांतही आंदोलने आणि हिंसाचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला शिका. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून युवकांचे म्हणणे तुम्हाला ऐकावेच लागेल आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतील असा टोला माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीएए ,एनआरसी आणि एनपीआर विरोधात झालेल्या विरोधी पक्षांच्या दिल्लीतील संयुक्त बैठकीत बोलताना लगावला.

देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर देशभरातील युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. त्यामुळेच सरकारविरोधी आंदोलने आणि निदर्शनांतून विद्यार्थी आपला राग व्यक्त करीत आहेत. सरकारचे काम देशाला विकासाची ,प्रगतीची दिशा दाखवणे आहे, ते न करता केंद्रातील मोदी सरकार अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी भलतेच मुद्दे पुढे आणत आहे. त्यामुळेच युवक ,शेतकरी आणि कामगारांच्या संतापाला तोंड फुटले आहे ,असा आरोप राहुल यांनी केला. मोदी सरकार अर्थव्यवस्था ,रोजगार आणि देशाच्या भविष्याबाबत विधायक कार्य करण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे, याची जाणीव झाल्यानेच देशातील जनतेत संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीला 20 पक्षांचे नेते उपस्थित होते.

देशातील युवक सरकार विरोधात उठवत असलेला आवाज योग्यच आहे. युवकांच्या रोजगाराबाबतच्या समस्या सोडविणे आणि अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणणे अशी कामे करण्याऐवजी मोदी सरकार युवकांचा आवाज पोलिसी बळाने चिरडू पाहतेय हे योग्य नव्हे. जनता सरकारच्या या हुकूमशाहीला योग्य उत्तर द्यायला समर्थ आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या