हिंदुस्थानच्या निवडणूक यंत्रणेत गडबड, बर्लिनमधून राहुल गांधींचा हल्ला

‘हिंदुस्थानातील संस्थात्मक व्यवस्थेवर घाऊक हल्ले होत असून सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचा विरोधकांविरोधात शस्त्रासारखा वापर होत आहे. देशातील निवडणूक यंत्रणेतही मोठी गडबड आहे,’ असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. जर्मनीतील बर्लिन येथे हर्टी स्कूलमध्ये चर्चासत्रात त्यांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले.

आम्ही लढत राहणार!

‘निवडणुकांमध्ये गडबड घोटाळा आहे हे तर स्पष्ट आहे, मात्र त्यावर फक्त बोलून चालणार नाही. विरोधकांना आता या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. आम्ही नक्कीच याचा सामना करू. योग्य पद्धतीने प्रतिकार करू आणि त्यात यशस्वी होऊ,’ असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

भाजप स्वतःला मालक समजतो!

‘हिंदुस्थानातील वातावरण पूर्ण बदलले आहे. स्वायत्त संस्था त्यांचे कर्तव्य पार पाडताना दिसत नाहीत. काँग्रेसने वर्षानुवर्षे देशाचा संस्थात्मक पाया बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्याकडे स्वतःची यंत्रणा म्हणून पाहिले नाही. याउलट भाजप देशाच्या संस्थांना स्वतःच्या मालकीच्या संस्था समजतो. त्यांचा वापर भाजपची राजकीय ताकद वाढवण्यासाठी होत आहे. भाजप आणि विरोधी पक्षांना मिळणाऱया देणग्यांतील फरकावरून हे स्पष्ट होते. भाजप आणि विरोधी पक्षांना मिळणाऱया निधीचे प्रमाण 30ः1 असे आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.

सीबीआय आणि ईडीचा शस्त्रासारखा वापर होतोय. भाजपच्या एकाही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. त्याच वेळी आमच्या लोकांच्या विरोधात असंख्य गुन्हे दाखल केले.