काळ्या जादूच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्ये लपवू नका, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

‘काळय़ा जादू’मुळे तुमचे नैराश्य दूर होणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळे’ कपडे परिधान करून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली होती. त्यावर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘देशाला काळ्या जादूसारख्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्ये लपवू नका’ असे म्हणत मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘मोदींना महागाई, बेराजगारी दिसत नाही का? देशाला काळय़ा जादूसारख्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्ये लपवू नका. तुम्हाला लोकांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील’ असा टोला राहुल यांनी लगावला आहे.

मोदी काय म्हणाले?

काही लोकांनी 5 ऑगस्ट रोजी ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटते की काळी वस्त्रे परिधान केली तर सर्व समस्या सुटतील, नैराश्य दूर होईल. पण त्यांना हे माहीत नाही की, त्यांनी कितीही काळी जादू केली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर कधीच निर्माण होणार नाही.