ते नतमस्तक तुमच्यासमोर होतात, पण काम अदाणी, अंबनीचे करतात, राहुल गांधी यांचा पंतप्रधानांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नतमस्तक तुमच्यासमोर होतात पण काम मात्र अदाणी-अंबानींचे करतात, असा टोला काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी लगावला. नोटाबंदी झाली, फायदा कुणाला झाला? तुम्ही पैसा बँकेत टाकला, तो पैसा कुठे गेला असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

बिहारमधील नवादा जिह्यातील हिसुआ व भागलपूर जिह्यातील कहलगाव येथे आज काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी व राजदचे तेजस्वी यादव यांनी संयुक्त सभा घेतली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. लडाखमध्ये घुसून चीनने आपले सैनिक मारले. परंतु पंतप्रधान मात्र देशाशी खोटे बोलले. चीनने घुसखोरी केलीच नाही असा छातीठोक दावा त्यांनी केला. 1200 किमी जमीन चीनने हडप केली. त्यावर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. लडाखमध्ये घुसलेल्या चीनला केव्हा बाहेर काढणार असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. गेल्या वेळी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. किती जणांना रोजगार मिळाला त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावी. लष्कर, शेतकरी आणि मजुरांसमोर मी नतमस्तक होतो अशी लोणकढी थाप तुमच्यासमोर मारतात आणि काम मात्र अदाणी, अंबानीचे करतात असा टोला त्यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या