राहुल गांधी यांचा तुफानी हल्ला! मोदींनी देश अमेरिकेला विकला!! एपस्टीन फाइल्स आणि अदानींवरील खटल्यामुळे ट्रम्पपुढे लोटांगण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-अमेरिकेतील मुक्त व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर तुफानी हल्ला चढवला. ‘‘हा करार म्हणजे नरेंद्र मोदींनी दबावाखाली येऊन केलेली तडजोड आहे. एपस्टीन फाइल्समधील गुपितं आणि गौतम अदानींवरील खटल्यामुळे मोदींनी ट्रम्पपुढे लोटांगण घातले आहे. देशाने कष्टाने मिळवलेले सगळे काही विकले आहे. संपूर्ण देशच अमेरिकेला विकला आहे,’’ अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली.

अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करारावर हिंदुस्थानने काल शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांनी सोमवारी रात्री याची घोषणा केली. त्यानंतर हिंदुस्थानचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी त्यास दुजोरा दिला. संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी या करारावर भाष्य केले. या वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. अमेरिकेशी होणारा व्यापार करार चार महिन्यांपासून थांबला होता. या चार महिन्यांत करारावर काहीच चर्चा झाली नाही. याची कारणे नरेंद्र मोदींना आणि मलाही माहीत आहेत. मात्र काल संध्याकाळी अचानक मोदींनी त्यावर स्वाक्षरी केली. याबद्दल राहुल यांनी आश्चर्य व्यक्त केले.

एपस्टीन फाइल्समध्ये खूप माल बाकी!

अमेरिका सरकार खुल्या करत असलेल्या एपस्टीन फाइल्समध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आला आहे. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, ‘‘एपस्टीन फाइल्समध्ये अजून खूप माल आहे. या फाइल्स पूर्णपणे प्रसिद्ध झालेल्या नाहीत. त्यात काय आहे याची देशाला उत्सुकता आहे. मात्र अमेरिकेने ते प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळेदेखील मोदी प्रेशरखाली आहेत,’’ असा दावा राहुल गांधी यांनी केला.

अदानी हीच मोदी-भाजपची आर्थिक तटबंदी

‘‘ज्यांनी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवली आहे, तेच आता ती उद्ध्वस्त करत आहेत. अदानींवर अमेरिकेत एक खटला सुरू आहे. मात्र केवळ अदानी हेच त्यांचे लक्ष्य नाही. नरेंद्र मोदी यांची आर्थिक तटबंदी हे त्यांचे लक्ष्य आहे. अदानींवरील खटला हा खरंतर मोदींवरचाच खटला आहे. कारण अदानी हेच मोदी आणि भाजपची आर्थिक ताकद आहे हे त्यांना माहीत आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

नरेंद्र मोदींवर भयंकर दबाव आहे. कराराच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेने, शेतकऱ्यांनी घाम गाळून, रक्त आटवून मिळवलेले सारे काही विकले आहे. हजारो कोटी खर्चून फुगवलेला मोदींच्या प्रतिमेचा फुगा फुटू शकतो. याचा अंदाज सत्ताधाऱयांना आणि खुद्द मोदींना आला आहे. त्यामुळेच ते मला बोलू देत नाहीत. मोदी घाबरलेत. त्यांनी अमेरिकेशी तडजोड केली आहे.