
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुरुक्षेत्र येथील कार्यक्रमात पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी काळातील आव्हानांना निर्भीडपणे सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीला न घाबरता आत्मविश्वासाने कामाला लागा, येणारा काळ हा काँग्रेसचाच असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंबाला कॅंटचे अध्यक्ष परविंदर सिंग परी आणि शहर अध्यक्ष पवन अग्रवाल डिपी यांची भेट घेऊन स्थानिक राजकारणावर सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देत त्यांनी प्रत्येक जिल्हा अध्यक्षांच्या समस्या जाणून घेतल्या.
राहुल गांधी यांनी यावेळी बचावात्मक रणनीतीचे महत्त्व अधोरेखित केले. राजकारणाची तुलना मार्शल आर्ट्सशी करताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही लढा केवळ आक्रमकतेने जिंकता येत नाही तर, बचावात्मक दृष्टिकोन ठेवूनही प्रभावीपणे लढता येते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अंबालाच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, तिथल्या स्थानिक राजकारणात काय सुरू आहे आणि नेत्यांच्या पक्षांतराच्या हालचाली कशा आहेत, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.
संविधान रक्षणाचा मुद्दा मांडताना राहुल गांधी म्हणाले की, आपल्याला महात्मा गांधींच्या विचारांनी आणि अहिंसेच्या मार्गाने संविधानाचे रक्षण करायचे आहे. पक्षात कोणीही मोठा किंवा लहान नसून नेते आणि कार्यकर्त्यांनी समानतेने व मिळून-मिसळून काम करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण एकत्र लढतो, तेव्हा श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव असता कामा नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.


























































