
नॅशनल हेराल्ड मनी लॉण्डरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज चौथ्या दिवशीही चौकशी केली. गेल्या चार दिवसांत त्यांची तब्बल 40 तास चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना उद्या मंगळवारीही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
राहुल गांधी यांचा रविवारी 52वा वाढदिवस होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज सकाळी 11.05 वाजता ते चौकशीसाठी मध्य दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावर असणाऱ्या ईडीच्या कार्यालयात हजर झाले. चौकशी दरम्यान राहुल गांधी यांना तासभर विश्रांती देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी या चौकशीविरुद्ध तसेच केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जंतरमंतर येथे निदर्शने केली. त्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. तसेच पोलीस आणि निमलष्करी दलाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ईडीने चार दिवसांच्या चौकशीत राहुल गांधी यांचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात आहेत. त्यांना वेळ देता यावा म्हणून आपली चौकशी 20 जूनपर्यंत पुढे ढकलावी, अशी विनंती राहुल यांनी ईडीकडे केली होती. त्यामुळे 17 जूनपासून त्यांची चौकशी केली गेली नव्हती.