नाविकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राहुरी

मासे पकडण्यासाठी पाण्यात टाकलेले जाळे पंख्याला अडकल्याने धरणाच्या मध्यावर होडी गटांगळ्या खाऊ लागली. पण नाविकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले. मुळा धरणाच्या पैलतीरी असलेल्या वावरथ जांभळीकडे ही घटना घडली आहे.

नेहमीप्रमाणे वावरथ येथील ग्रामस्थांचा मुळा धरणा जवळ थांबणा-या होडीतून काल सायंकाळी प्रवास सुरू झाला.प्रवाशां बरोबरच राहुरीत शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन ५ विद्यार्थी याच होडीने घराकडे चालले होते. दरम्यान होडी धरणाच्या मध्यभागी पोहचताच अचानक थांबल्याने प्रवाशात गोंधळ उडाला.होडीला नेमके काय झाले ? हे काहुर क्षणभर प्रवाशांच्या मनात उठले.एकीकडे अचानक बंद पडलेली होडी तर दुसरीकडे मुळा धरणाचा ठाव नसणारा अथांग जलाशय हा काळजाचा थरकाप उडविणारा प्रसंग प्रवाशांसमोर समोर उभा राहिला.माञ चालकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ दुस-या होडीची व्यवस्था करून प्रवाशांना पैलतिरी सुखरूप सोडण्याचे काम केले.

मासे पकडण्याचे जाळे होडीच्या पंख्याला अडकल्याने हा प्रसंग उदभवला.

अखेर दोन तासाच्या प्रयत्नानंतर पंख्याला अडकलेले हे जाळे दूर करून होडी किना-याला नेण्यात चालकाला यश आले.मुळा धरणाच्या पैलतीरी असलेल्या वावरथ,जांभळी,जांभुळबन या भागातील रहिवासी असलेल्या ग्रामस्थांना प्रवासासाठी शासनाकडुन आधुनिक होडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

मूळा धरणातुन होडीची व्यवस्था असल्याने वावरथ,जांभळी,जांभुळबन या भागातील ग्रामस्थांना प्रवासाची सुखकर सोय उपलब्ध झाली आहे.दरम्यानच्या कालावधीत शासनाची होडी मिळण्यास विलंब होत असल्याने अडीच लाख रूपयांची पर्यायी होडी धरणाच्या पैलतीरी असलेल्या गावक-यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.