राहुरी – कर्जबाजारीमुळे 3 वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन वर्षांच्या चिमुकलीचा खून करून शेतकरी पित्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली आहे. अनिल दिनकर पाळंदे (वय 47) आणि आदिरा अनिल पाळंदे अशी मृतांची नावे आहेत.

पाळंदे यांनी गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत शेजारील मित्रांबरोबर गप्पा मारल्या. त्यानंतर झोपण्यास जातो, असे सांगून घरी गेले. रात्री त्यांनी आदिराच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून केला. यानंतर अनिलने घराच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, अनिल यांच्यावर सहकारी संस्थांचे कर्ज होते. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली होती. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? पुढील पिके कशी उभी करायची? यातून त्याने मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिलची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली असून, तिला दुसरी मुलगी झाली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी अनिल पाळंदे यांची हृदय शस्त्र्ाक्रिया झाली असल्याने शेतीतील जड काम ते करू शकत नव्हते. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, हेड कॉन्स्टेबल संजय पठारे, कॉन्स्टेबल ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

आपली प्रतिक्रिया द्या