राहुरीतील वकील दांपत्याचा खून प्रकरणातील पाचवा आरोपी जेरंबद; शनिशिंगणापूर रोडवर अटक

राहुरी न्यालयातील वकील दांपत्याचे न्यायालयातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. या हत्या प्रकरणातील पाच जणांच्या टोळीपैकी चार आरोपींना 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. प्रकरणातील पाचवा आरोपी कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे,(रा. उंबरे ता.राहुरी) यालाही आता राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे,याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि वांबोरी बीटचे पथक शनिशिंगणापूर रोडवर पाठविण्यात आले. त्याला तेथून अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पो.हे.काँ. वाल्मीक पारधी, पो.का. अंकुश भोसले, पो.का. सतीश कुऱ्हाडे, पो.हे.काँ. विकास साळवे ,पो.हे.काँ. अशोक शिंदे,पो.ना. नागरगोजे ,पो.का.अदिनाथ पाखरे, पो.ना. बागुल यांनी ही कामगिरी केली आहे.