
सामना प्रतिनिधी। राहुरी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा या मागणीसाठी शहर शिवसेनेचे सुनील कराळे व इतर शिवसैनिकांनी मुख्याधिकारी दालनासमोर मंगळवार पासून उपोषण सुरू झाले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तीन महिन्यापूर्वी निवड झालेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची ही दयनीय अवस्था झाली आहे.या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कामकाजा वरून गेली २ वर्ष वादंग सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या वादाचा रंगलेला कलगीतुरा थेट जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत पोहचल्याने देवळाली प्रवरा नगर परिषद संपुर्ण जिल्ह्यात चर्चेला आली होती. तर ४ महिन्यापूर्वी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेचा पदभार स्वीकारला होता. मात्र मुख्याधिकारी महानवार ४ महिन्याच्या कालावधीत क्वचितच कामावर हजर झाल्याने नागरी सुविधा तसेच विकास कामे ठप्प झाली आहेत. शहराच्या स्वच्छतेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा या मागणीशी पदाधिकारी देखील सहमत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली. उपनगराध्यक्ष संसारे म्हणाले की पंधरवड्या पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंञी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील नगर परिषदेचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली होती. माञ अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नाही.
या बैठकीत नगर परिषदांच्या ठप्प झालेल्या कामकाजाला गती मिळण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा ही मागणी करण्यात आली होती.४ महिन्यापूर्वी मुख्याधिकारी महानवार यांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या कारभाराची सूत्र हाती घेतली. माञ नियमीत हजेरीचा पहिला पंधरवडा हा अपवाद वगळता इतर साडेतीन महिन्यात बहुतांशी दिवस मुख्याधिकारी यांना नगर परिषदेचे कामकाज पाहता आले नाही. महानवार यांच्याकडे जिल्हा प्रशासन अधिकारी यांचा अतिरिक्त पदभार असल्याने देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कामकाजावर मर्यादा आल्या असल्याचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी म्हटले.
जामखेड या नव्या नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत.या तुलनेत मुख्याधिकारी व्यवस्था होण्याची गरज होती.माञ नगर परिषदेच्या तुलनेत मुख्याधिकारी जागा कमी असल्याने एकाच अधिका-याला दोन नगर परिषदेचा कारभार सांभाळावा लागत आहे.पर्यायाने कामकाजावर मर्यादा आल्या आहेत.































































