
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील व हिमाचल प्रदेश येथे लष्करात कार्यरत असलेले जवान ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय 24) यांचा घरी सुट्टीवर आलेले असताना पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे सैन्यदल व पोलिसांच्या वतीने तीनदा हवेत गोळीबार करुन अखेरची सलामी देवून शासकीय इंतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
राहुरी तालुक्यातील बेलकरवाडी येथील पाझर तलाव मागील आठवड्यापर्यंत कोरडा होता. गेली दोन-तीन दिवसांपासून या परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे पाझर तलावात 75 टक्के पाणीसाठा झाला. 30 ऑगस्ट रोजी सुट्टीवर आलेले ज्ञानेश्वर ढवळे आपल्या मित्रांबरोबर उत्सुकतेने पोहण्यासाठी तलावात गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. सोबत असलेल्या मित्रपरिवाराने त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक तरुणांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढून उपचारासाठी राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परंतू तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर यांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर हे 26 सप्टेंबर रोजी आपल्या सेवेवर रुजू होणार होते. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथील मित्राबरोबर ज्ञानेश्वर सुट्टीवर आले होते. ते दोघेही पुणे येथून हिमाचल येथे जाणार होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, वडील, चुलते, चुलती, मोठा भाऊ व आजी असा परिवार आहे.
अंत्यविधीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, ह.भ.प.नाना महाराज गागरे,बाळकृष्ण महाराज कांबळे, अर्जुन महाराज तनपूरे, भगवान महाराज यमगर, तहसिलदार चंद्रजित रजपूत, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुभेदार गुंजाळ, वी. ल. कोरडे, स्वाडर्न लीडर सह त्यांचे सहकारी एम. आय. आर. सी. सैनिक दल त्याचप्रमाणे माजी सैनिक नामदेव वांढेकर, ताराचंद गागरे आदीसह विविध पक्षातील राजकीय नेते, स्थानिक नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.