मेहकरात अवैध सोनोग्राफी सेंटरवर छापा; दोघांना घेतले ताब्यात

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील पवनसुत नगरमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी पथक व मेहकर पोलीस ठाण्यातील पथकाने शनिवारी दुपारी शहरातील पवनसुत नगरमध्ये वैशाली संदीप मुठाड यांच्या जागेत भाड्याने अवैध सोनोग्राफी सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी किसन हरिभाऊ गरड (रा. करंजी, ता. रिसोड जि. वाशीम) व गणेश शिवाजी सुलताने (गुंजखेड, ता. लोणार जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.