कोंढव्यात हुक्का बारवर छापा, मालकासह व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा

शहरातील कोंढवा परिसरात हॉटेल क्लब 24 दोराबजीमध्ये सुरू असलेल्या हुक्का बारवर सामाजिक सुरक्षा विभागासह अमंली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून चार चिलीम आणि इतर साहित्य असा 36 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंमदवाडीतील हॉटेल क्लब 24 दोराबजीमध्ये अवैधरित्या हुक्काबार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलचे मालक अमर खंडेराव लुटरे (रा. महंमदवाडी ) आणि मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव (30) हुक्काबार चालवित असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरूद्ध कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या