महापेत बेकायदा कॉल सेंटरवर धाड; 20 आरोपींना अटक, शेअर्स मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे सांगून 12 कोटींची फसवणूक

शेअर्स मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो नागरिकांची सुमारे 12 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. हे कॉल सेंटर महापे एमआयडीसीतील मिलेनियम पार्कच्या तिसऱ्या मजल्यावर कार्यरत होते. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यासाठी कॉल सेंटरमधून त्यांच्या संगणकावर व्हायरस अटॅक केला जात होता. त्यामुळे संगणकाच्या स्क्रीनवर मायक्रोसॉफ्ट एरर कोड असा मेसेज दिसायचा. या मेसेजमधील व्हीओआयपी क्रमांकावर संपर्क केल्यानंतर अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जायची. याप्रकरणी 20 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून फरारी सात आरोपींचा ते कसून शोध घेत आहेत.

महापे एमआयडीसीतील मिलेनियम बिझनेस पार्कमधील इमारत क्रमांक 3 च्या तिसऱ्या मजल्यावर बोगस कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आणि प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी या मजल्यावर असलेल्या द वेल्थ ग्रोथ, द कॅपिटल सव्हिसेस, सिग्मा, ट्रेड नॉलेज सव्हिसेस आणि स्टॉक व्हिजन या कंपन्यांमध्ये 97 तरुण आणि तरुणी काम करताना आढळून आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर फसवणुकीची नवीन मोडस ऑपरेंडी उघड झाली. ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

शेअर्स मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो नागरिकांकडून या कॉल सेंटरच्या माध्यमातून 12 कोटी 29 लाख रुपये जमा केले.

नागरिकांची फसवणूक करण्यासाठी देशभरातील 71 बँक खात्यांचा वापर करण्यात आला. या खात्यांची तपासणी केली असता 61 खात्यांमध्ये 12 कोटी 29 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळून आले.

गृह मंत्रालयाने सुरू केलेल्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर काही खात्यांची तपासणी केली असता 31 सायबर फसवणुकीच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.

स्क्रीनवर मायक्रोसॉफ्ट एरर

या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची सायंकाळी साडेसहा ते पहाटे साडेतीन या कालावधीत फसवणूक केली जात होती. अमेरिकन नागरिकांच्या संगणकावर रॅमसोमवेअर आणि मालवेअर अटॅक केला जायचा. त्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या संगणकांची स्क्रीन लॉक होऊन त्यावर मायक्रोसॉफ्ट एरर असा मेसेज दिसायचा. या मेसेजमध्ये मायक्रोसॉफ्ट कस्टम सपोर्ट नंबर म्हणून कॉल सेंटरचा व्हीओआयपी नंबर नमूद केलेला असायचा. या नंबरवर संपर्क साधल्यानंतर अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जायची. त्यासाठी कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी अमेरिकन व्यक्तींची खोटी नावे सांगून नागरिकांचा विश्वास संपादित करित होते.