रायगड जिल्ह्यातील सर्व घाट रस्त्याचे होणार सेफ्टी ऑडिट

455

सुरक्षिततेच्‍या उपाययोजनांचा अभाव, वाहनांची वाढती संख्‍या आणि वेगावर नसलेले नियंत्रण यामुळे महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.  यावर नियंत्रण आणण्‍यासाठीच पहिले पाऊल रायगड जिल्‍हा प्रशासनाने उचलले आहे. जिल्‍हयातील सर्व घाट रस्‍त्‍यांसह मुंबई गोवा महामार्गाचे सेफ्टी ऑडीट करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. पुण्‍यातील सेंट्रल इन्‍स्‍टीटयूट ऑफ रोड ट्रान्‍स्‍पोर्ट या संस्‍थेवर ही जबाबदारी सोपवण्‍यात आली असून येत्‍या महिनाभरात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

रायगड जिल्‍हयाचा विचार करता प्रामुख्‍याने मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे जुना महामार्ग तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हे प्रमुख रस्‍ते जिल्‍हयातून जातात याखेरीज खंडाळा घाट, बोरघाट, कशेडी घाट, आंबेनळी घाट हे प्रमुख धोकादायक आणि अपघातप्रवण घाट आहेत. या ठिकाणी सातत्‍याने अपघात होत असतात. त्‍यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर अनेक जण कायमचे जायबंदी होतात. या अपघातांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून प्रमुख रस्‍त्‍यांबरोबर घाट रस्‍त्‍यांचेही सेफ्टी ऑडीट केले जाणार आहे. त्‍यात रस्‍त्‍यांची सद्यस्थिती, अपघातांमागची प्रमुख कारणे, प्रशासनाने त्‍या ठिकाणी पुरवण्‍याच्‍या सुविधा, वाहनचालकांनी घ्‍यावयाची काळजी करावयाच्‍या उपाययोजना याबाबतचा सुस्‍पष्‍ट अहवाल अपेक्षित आहे. मुंबई गोवा महामार्गाची पूर्ती दुरवस्‍था झाली आहे. त्‍याचेही सेफ्टी ऑडीट करून आवश्‍यक त्‍या उपाययोजना केल्‍या जाणार आहेत.

जिल्‍हाधिकारी यांनी घेतली बैठक  

जिल्‍हयातील अपघात प्रवण भागात बऱ्याच अंशी उपाय योजना करण्‍यात आल्‍या आहेत. तरीदेखील अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या सर्व उपाययोजना करण्‍यात येत असल्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले. सावित्री पूल दुर्घटना आणि आंबेनळी घाटात बसला झालेला भीषण अपघात या पार्श्‍वभूमीवर या रस्‍त्‍यांचे आणि घाट रस्‍त्‍यांचे सेफ्टी ऑडीट होणार आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी महामार्गांची पाहणी करून सुरक्षाविषयक अभ्‍यास केला. त्‍यानंतर आज महामार्ग पोलीस, राष्‍ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण , उपप्रादेशिक परीवहन कार्यालय , रस्‍ते विकास महामंडळ,  रायगड पोलीस, ट्रान्‍सपोर्ट ऑपरेटर, टोलनाका ठेकेदार यांची संयुक्‍त बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या