पारंपरिक गडपुजनाने स्वराज्याची राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात

704

शुक्रवारी 5 जूनला सायंकाळी पाचच्या सुमारास राजसदरेसमोरील नगारखाना येथे गडक-यांच्या उपस्थितीत पारंपरिक गडपुजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. तर गडदेवता शिरकाई देवीसमोर पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ तसेच शिवरायांच्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय झाले होते. उद्या 6 जुन या मुख्य दिवशी सकाळी ध्वजारोहन, पालखी सोहळा आणि राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होणार आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असुन गर्दी टाळण्यासाठी सोहळ्याचे सोशल मिडियाद्वारे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी समितीचे पदाधिकारी शुक्रवारी सकाळीच छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष करत रायगडाकडे रवाना झाले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने गेल्या तेरा वर्षांपासून किल्ले रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. वर्षानुवर्षाचा पुरातत्व खात्याचा विरोध झुगारून याच समितीने ऐतिहासिक मेघडंबरीत शिवरायांची मुर्ती विराजमान केली. आज हा सोहळा लोकोत्सव बनला आहे. दरवर्षी लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत सोहळा दिमाखात साजरा होतो. गडावरील शिवमय वातावरण निर्माण होऊन, सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यात शिवछत्रपतींचा जयघोष दणाणतो. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा साधेपणाने व मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा होणार असल्याचा निर्णय मार्गदर्शक करवीरचे युवराज व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी घेतला होता. तसेच शिवराज्याभिषेक घराघरात,’ या संकल्पनेखाली शिवभक्तांनी घरोघरी सोहळा साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या सोहळ्याची तयारी संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यानुसार आज पहाटेच ऐतिहासिक भवानी मंडप येथुन छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, असा अखंड जयघोष करीत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, विनायक फाळके, संजय पोवार, प्रवीण पोवार, सोमनाथ लांबोरे, प्रवीण हुबाळे, सत्यजित आवटे, राहुल शिंदे, सागर दळवी, अमर पाटील, योगेश केदार, दयानंद हुबाळे, अमर जुगर, दीपक सपाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते दुर्गराज रायगडाकडे रवाना झाले.

आज असा होणार सोहळा :
– ध्वजपूजन व ध्वजारोहन, स्थळ : नगारखाना
– युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीसह राजसदरेवर आगमन
– युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक
– मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
– युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन
– युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह जगदीश्वराचे दर्शनासाठी प्रस्थान
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन

आपली प्रतिक्रिया द्या