
रायगड जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि अजित पवार गटाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज भाजप आणि अजित पवार गटाच्या रायगड जिल्हा परिषदेतील निर्वाचित सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपापली स्वतंत्र गट नोंदणी केली. भाजपच्या गटनेतेपदी वैकुंठ पाटील तर अजित पवार गटाच्या गटनेतेपदी मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ५, काँग्रेसने २, भाजपने १५, अजित पवार गटाने १६ तर शिंदे गटाने २१ जागा जिंकल्या. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३० सदस्य संख्या गरजेची आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी सर्व पक्षांच्या सदस्यांची गट नोंदणी बंधनकारक आहे. त्यानुसार भाजप आणि अजित पवार गटाने रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर गट नोंदणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांच्यासमोर ही प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील उपस्थित होते. सर्व सदस्यांची ओळख पटवून गट नोंदणी करण्यात आली.
























































