
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्त २१ जागा मिळविलेल्या शिंदे गटाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीतच खलबते सुरू आहेत. १६ जागा जिंकणारी राष्ट्रवादी काँग्रेस व १५ जागा जिंकणारी भाजप एकत्र आल्यास सत्तेचे संख्याबळ ‘जुळणार’ आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला रोखण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी ‘फिल्डिंग’ लावली असून सत्तेसाठी इतर पक्षांना सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय नंतर करू असे सूचक वक्तव्य केल्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडली. सोमवारी जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ५, काँग्रेसने २, भाजपने १५, अजित पवार गटाने १६ तर शिंदे गटाने २१ जागा जिंकल्या. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३० सदस्य संख्या असणे गरजेचे आहे.
आकडेमोड सुरू
मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आकडेमोड सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे १६ व भाजपचे १५ सदस्य निवडून आले आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांचे ३१ संख्याबळ होते. त्यामुळे शिंदे गटाला बाजूला ठेवून भाजप आणि अजित पवार गटाने सत्तेचा सारीपाट रचण्याची रणनीती आखली आहे.
महायुतीत सुंदोपसुंदी
रायगड जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवण्यावरून महायुतीत सुंदोपसुंदी सुरू आहे. रायगडमध्ये शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. अनेक ठिकाणी आम्ही भाजपसोबत युतीने लढलो आहोत. सत्ता स्थापन करताना इतर पक्षांना सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय नंतर घेतला जाईल अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिल्यानंतर लगेचच गोगावले यांनीही आम्ही भाजपसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे सांगून तटकरे यांच्याऐवजी भाजपला चुचकारले आहे.





























































