रेल्वेच्या बुकिंग क्लार्कना कोरोनाचा विळखा, पश्चिम रेल्वेने 35 शिफ्ट कमी केल्या

690

उपनगरीय लोकल सेवा जरी सोमवार 15 जूनपासून सुरू करण्यात आली तरी त्याचा परिणाम रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनने केला आहे. तिकीट खिडक्यांवरील बुकिंग क्लार्कना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने तातडीने सोमवारपासून प्रवासी आरक्षण केंद्राच्या 35 शिफ्ट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपनगरीय फेऱ्या सुरू करण्यात आल्याने तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नालासोपारा, विरार आणि बोरिवलीसारख्या स्थानकांतून सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी असल्याने लोकल ट्रेनना गर्दी होत आहे. त्यामुळे खिडक्यांवर ‘सोशल डिस्टंन्सिंग’ पाळताना धांदल उडत आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

कर्मचाऱ्यांच्या कामाच्या जागा अयोग्य असून त्यांना सॅनिटाईझ केले जात नाही. तसेच फ्रंटलाइन स्टाफला पुरेसे प्रोटेक्टशन दिले जात नसल्याचा आरोप वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे विभागीय सचिव प्रशांत कानडे यांनी केला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांच्या मास्क आणि सॅनिटायझर तसेच अनेक सुरक्षात्मक उपाय योजण्याचे आदेश वाणिज्य व्यवस्थापकांनी दिले आहेत.

वांद्रे पुलावरील खिडकी बंद होणार
पीआरएस केंद्रे आणि यूटीएस काऊंटरची गर्दी कमी करण्यासाठी त्यांच्या टर्नआऊटप्रमाणे डय़ुटी लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वांद्रे स्थानकातील दक्षिण-पूर्व पादचारी पुलावरील खिडकी बेसिक सुविधा नसल्याने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱयांना सर्व सेफ्टी गियर्स पुरविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे येथील शिफ्ट घटणार
सोमवार 22 जूनपासून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनस येथील तिकीट खिडक्यांवरील बुकिंग क्लार्कच्या शिफ्ट प्रत्येकी तीनने तर विरार आणि अंधेरी येथील कामगारांच्या शिफ्ट दोनने कमी करण्यात येणार असून एकूण 35 शिफ्ट कमी करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या