
कोरोनाच्या महामारीनंतर रेल्वे प्रवाशी स्मार्ट झाले आहेत. तिकीट खिडक्यांवरील लांबलचक गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी यूटीएस ऍपच्या माध्यमातून पेपरलेस तिकीट बुकिंगला प्रवाशी पसंती देत आहेत. कोरोनापूर्व कालावधी म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर 2019च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत यूटीएस ऍपद्वारे होणाऱया तिकीट विक्रीत पश्चिम रेल्वेने 16 टक्के वाढ नोंदवली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 6.39 लाख प्रवाशांनी यूटीएस ऍपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग केले असून याद्वारे पश्चिम रेल्वेला 75 कोटी 35 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जो कोरोनापूर्वी याच कालावधीमधील 60 कोटी 80 लाख रुपयांच्या तुलनेत 24 टक्के अधिक आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्यावतीने देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे मार्च 2020मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत यूटीएस ऍपद्वारे होणारी ऑनलाईन तिकीट विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कोरानाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा या ऍपची सेवा सुरू करण्यात आली होती.






























































