रेल्वेगाड्यातील शौचालये अस्वच्छ; पाणी नसल्याच्या लाख तक्रारी, संसदेत सादर केलेल्या कॅगच्या अहवालातून उघड

रेल्वेचे जाळे देशभरात पसरले असून कोटय़वधी जनतेसाठी रेल्वेगाडीने प्रवास करणे अतिशय सोयीचे ठरते. परंतु, अनेक रेल्वेगाडय़ांच्या शौचालयांमध्ये तसेच वॉश बेसिनमध्ये पाणीच नसल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून स्वच्छतही राखली जात नसल्याची धक्कादायक माहिती कॅग अर्थात हिंदुस्थानचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षकांच्या अहवालातून समोर आली आहे. याबाबत तब्बल 1 लाख 280 तक्रारी रेल्वेकडे आल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅगचा हा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला.

2022-23 या आर्थिक वर्षात रेल्वेगाडय़ांमधील विविध प्रकारच्या समस्यांबाबत किती तक्रारी आल्या याबाबतचा अहवाल पॅगने तयार केला आहे. आलेल्या तक्रारींपैकी 33 हजार 937 म्हणजेच 33.84 टक्के तक्रारींच्या निवारणासाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ लागला. 2018-19 ते 2022-23 दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमध्ये किती स्वच्छता होती, पाण्याचा पुरेसा साठा होता का, अन्नाचा दर्जा अशा विविध बाबतीत कॅगने निरीक्षण नोंदवत अहवाल तयार केला. 96 निवडक रेल्वेगाडय़ांमधील 2 हजार 426 प्रवाशांना प्रश्न विचारून सर्वेक्षण करण्यात आले. या प्रवाशांमधील पाच झोनमधील 50 टक्के प्रवाशांनी तर दोन झोनमधील 10 टक्के प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

स्वच्छतेबद्दल चिंता, डबे बाहेरून साफ केले

रेल्वेगाडय़ांमधील स्वच्छतेबद्दल कॅगच्या अहवालात तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वेगाडय़ांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रवाशांनी कमी प्रमाणात वापर केला. त्यामुळे 132,060 डब्यांची स्वच्छता यंत्राद्वारे केवळ बाहेरून करण्यात आली. त्यामुळे रेल्वेगाडय़ा आतून अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरडय़ा अवस्थेत असल्याचे दिसून आले. अशा डब्यांमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत असून अस्वच्छतेबद्दल मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे.