
रेल्वेने रेल्वेतील रनिंग स्टाफसाठी किलोमीट्रेज अलाउन्स (केएमए) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर घेण्यात आला आहे. हा भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू केला जाणार आहे. या निर्णयामुळे रेल्वेतील लोको पायलट आणि गार्ड यांसारख्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा एरियर्स थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
किलोमीट्रेज भत्त्याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे कर्मचारी रनिंग डय़ुटीशी संबंधित आहेत. यामध्ये मेल, पॅसेंजर आणि मालवाहतूक ट्रेनचे लोको पायलट, सहायक लोको पायलट, शटिंग स्टाफ, ब्रेक्समॅनसोबत गार्ड (ट्रेन मॅनेजर) यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना हा भक्ता एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनने वर्तवली आहे. मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटला प्रति 100 किलोमीटरसाठी 606 रुपये मिळतील. पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटसाठी हे दर 600 रुपये, तर मालवाहतूक ट्रेनच्या पायलटसाठी 594 रुपये ठरवण्यात आले आहे. सहायक लोको पायलटला आता 430 रुपये प्रति 100 किलोमीटर मिळतील. तर शटिंग ग्रेड-1 साठी हा दर 461 रुपये ठरवण्यात आला आहे. किलोमीट्रेज अलाउन्स रनिंग स्टाफच्या पगारातला एक मोठा भाग आहे. यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. यामुळे आता कर्मचारी जेवढे दूरपर्यंत रेल्वे चालवतील तेवढी त्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होईल.
ट्रफिक रनिंग स्टाफ म्हणजेच गार्डसाठी सुद्धा नवीन दर लागू केले आहेत. यात मेल किंवा एक्सप्रेस गार्डला 549 रुपये प्रति 100 किमीसाठी मिळतील. वरिष्ठ पॅसेंजर आणि गुड्स गार्डसाठी 543 रुपये मिळतील. साधारण गुड्स गार्डसाठी 537 रुपये प्रति 100 किमीसाठी मिळतील. असिस्टेंट गार्डसाठी प्रति 100 किमीसाठी 305 रुपये दिले जातील. या भत्त्यानंतर पगारात वाढ होईल. जर समजा एखाद्या गार्डची बेसिक सॅलरी 40 हजार असेल आणि त्याने 411 किमीचा प्रवास केला तर त्याला 2196 रुपये अतिरिक्त मिळतील. जर त्याने 24 दिवस डय़ुटी केली तर पगारात अतिरिक्त जवळपास 52,704 रुपये मिळतील. रेल्वे रनिंग स्टाफला हा विशेष भत्ता दिला जातो. कारण, कठीण परिस्थितीत आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांत त्यांना डय़ुटी करावी लागते. त्यांना सामान्य डेली अलाउन्स टीए-डीएची सुविधा मिळत नाही.

























































