तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार व रविवारनंतर सोमवारीही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सलग तीन दिवस झालेल्या पावसाने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर रिंगरोडच्या परिसरातील कोलटेभे, मुतखेल, तनवाडी, सांम्रद, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी व घाटघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाने मंगळवारी दिवसभर उसंत घेतल्याने पिवळाधम्मक उन्हं पडली होती. शनिवारपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला तरीदेखील भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 11 टक्केच असल्याने तो वाढण्यास मोठ्या संततधार पावसाची अपेक्षा आहे.
शनिवारपासून सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे डोंगररांगेतून बऱ्याच ठिकाणांहून धबधब्यांची मालिका सुरु झाल्याचे पहायला मिळाले. रविवार व सोमवारीही झालेल्या पावसाने कोलटेभे, रतनवाडी, सांम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे परिसरातील भातरोपांचे टाकलेले राब ओढून आले आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील गावांना या पावसाने झोडपून काढल्याने आदिवासी शेतकऱ्यांची शिवारातील भातशेतीचे खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. लवकरच या परिसरातून भाताच्या आवणीस सुरूवात होऊ शकेल. या पावसाने रतनवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटल्याचे सांगण्यात येत आहे. कारण भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून दररोजच पाऊस पडतोय. असे असले तरीदेखील भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्यास धरणाच्या पाणलोटातून मात्र जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. सद्यःस्थितीत भंडारदरा धरणात 1229 दशलक्ष घनफूट असे अवघे 11 टक्केच पाणी उपलब्ध आहे.
एका आठवड्यापूर्वी घाटघर परिसरातून झालेल्या ढगफुटीसदृश पावसानंतर दैनंदिन 250 मेगावॅट विद्युत निर्मितीच्या घाटघर जलउदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या उर्ध्व जलाशयात विद्युत निर्मितीसाठी आवश्यक पाण्याची साठवण ठेवून उर्वरित पाणी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात आले असून यासाठी उर्ध्व जलाशयाचे पाचही लोखंडी दरवाजे एक फुटाने वर उचलून देण्यात आले. एका आठवड्यापूर्वी घाटघर येथे दिवसाच्या एका तासात तब्बल 81 मिलिमीटर पाऊस पडला. घाटघर ग्रामपंचायतचे उपसरपंच एकनाथ खडसे यांनी सांगितल्यानुसार घाटघर परिसरातून लवकरच भात लागवडीस सुरुवात होणार आहे.