रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने रस्त्यांची दुर्दशा, अनेक गावांचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

चार दिवसांपासून मुसळधार पाऊस, वादळी वारा याने जिल्ह्यात थैमान माजले होते. मुसळधार पावसाने जिल्ह्यात रस्तेच वाहून गेले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यांना, महामार्गाला भेगा पडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला असून गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आधी पावले उचलावी लागणार आहेत.

जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला होता. मात्र निसर्गाच्या रौद्ररूपापुढे माणूस हा हतबल झाला होता. पावसाचे रुद्ररुप जिल्ह्यात हाहाकार माजवून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते, राज्य मार्ग, महामार्ग हे पावसाने वाहून गेले आहेत. महाडमध्ये किल्ले रायग़ड विभागातील सावरट-बांधणीचा माळ रस्ता महाकाय दरडीतसोबत वाहून गेला आहे. तर पोलादपूर मधील कोतवाल रेववाडी या रस्त्याला मोठी भेग पडली आहे. महाडमधील मुंबई गोवा महामार्गावर गांधार पुलावर भेगा पडल्या आहेत.

रोहा शहरात पुरामुळे अष्टमी रस्त्याला भेगा पडल्या असून नागोठणे रस्त्यावरील मोरीचा रस्ताही खचला आहे. पाली पुलावर मोठे भगदाड पडले आहे. माणगाव मधील कुंभे धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडल्या असल्याने ज रस्ताही निकामी झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्याची पावसाने दुर्दशा झाली आहे. जिल्ह्यातील या वाहून गेलेल्या व भेगा पडलेल्या रस्त्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच या मार्गावरची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचेही हाल झाले आहेत. मुसळधार पावसाने आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रस्त्याची वाताहत झाली आहे. या वाताहत झालेल्या रस्त्याची लवकरच दुरुस्ती प्रशासनाकडून सुरू करून वाहतूक सुरू होणे गरजेचे आहे.