शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदतीसाठी शिवसेनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन

736

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. शेतकरी राजाला या नुकसानीतून वाचविण्यासाठी शिवसेनेने चंद्रपूरमध्ये धरणे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 8 हजार प्रति हेक्टरी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. म्हणून राज्यपालांनी पुन्हा यावर विचार करून शेतकरी राजाला हेक्टरी 25 हजारांची मदत करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी केली.

शेतकऱ्यांना तात्काळ 25 हजार हेक्टरी आर्थिक मदत, कर्जवसुली सक्तीने करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांचे वीज मीटर बंद करण्यात न यावे, पिकविम्याचे पैसे तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात शहर प्रमुख प्रमोद पाटील, नगरसेवक सिक्की यादव, बबन उरकुडे, निलेश बेलखेडे, प्रकाश चंदनखेडे आदी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या