
सामना प्रतिनिधी । बीड
मुक्ताई…मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई… असा जयघोष करत आज शनिवारी सकाळी दहा वाजता संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे बीडमध्ये आगमन झाले. आगमन होताच जालना रोड, सुभाष रोड, माळीवेस भागात व्यापारी संघटनांसह भाविकांनी पालखीचे दर्शन घेत मोेठ्या उत्साहात वारकऱ्यांचे स्वागत केले. दरम्यान मुक्ताईंच्या पालखीचे आगमन होताच शहर व परिसरात वरूणराजाचेही आगमन झाले.
आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवलेल्या आणि तब्बल ३०९ वर्षाची समग्र परंपरा असलेल्या संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे आज शनिवारी आगमन झाले. तत्पुर्वी संत मुक्ताईंच्या पालखीचा शुक्रवारचा मुक्काम नामलगाव फाटा येथे झाला. पालखीचा पहिला मुक्काम माळीवेस येथील श्री हनुमान मंदीरात होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मंदिर ट्रस्ट सज्ज झाले आहे. भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अॅड. संपतराव मार्कंड, अॅड. प्रसाद मनसबदार, सुरेश नहार आदींनी केले आहे. आज शनिवारचा मुक्काम संपवून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता संत मुक्तार्इंच्या पालखीचे पेठ बीडमधील श्री बालाजी मंदिराकडे मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे.




























































