कोकणात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । देवरूख

शुक्रवारनंतर आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने देवरूखसह परिसराला झोडपून काढले. सोमवारी दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळात ढगांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळला. रत्नागिरीतही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. यानंतर शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने देवरूख आणि संगमेश्वर परिसराला झोडपले. रविवारी दुपारनंतर संगमेश्वर आणि देवरूखला झोडपून काढणारा पाऊस आज सोमवारी दुपारी पुन्हा अवतीर्ण झाला. आज दोन तासात पावसाने पुन्हा एकदा आपला इंगा दाखवला. पहिल्याच पावसाने देवरूखातील रस्त्यांवरून गटारगंगा वाहत असल्याचे पाहायला मिळत होते. दोन तासात शहरातील सर्वच रस्त्यांवर ही स्थिती पाहायला मिळाली.

गेल्या चार दिवसात पहिल्याच पावसात महावितरण पुर्णतः नापास झाल्याचे दिसुन आले. चार दिवसात तालुक्यातील बहुतांशी गावातील विज पुरवठा विस्कळीत असून देवरूखसह संगमेश्वर परिसरात रविवारी रात्री पासून गायब झालेला वीज पुरवठा आज सकाळपर्यंत सुरळीत झालेला नव्हता. सोमवारी नियमित कामांसाठी दिवसभर वीज पुरवठा खंडीतच ठेवण्यात आला आहे. चार दिवस पाऊस पडूनही वातावरणातील उकाडा कमी झालेला नाही.