
रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास सर्व नगरसेवकांचं मानधन आणि कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्याचा धाडसी निर्णय महापौर राखी कांचार्लवार यांनी घेतलाय. गतवर्षीची पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचं महत्त्व पटवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं.
चंद्रपूर महानगरपालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पाण्याच्या वापरावर मंथन झालं. पाण्याची बचत व्हावी आणि नागरिकांमध्ये एक संदेश जावा, यासाठी महापालिकेनं एक धाडसी निर्णय घेतलाय. महापालिकेतील सर्व सदस्यांना आणि कर्मचाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करण्यात आलं. ही उपाययोजना करण्यासाठी या नगरसेवक व कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या वेळ देण्यात आला आहे. त्यानंतरही जर ही योजना अंमलात आणली नाही तर मार्च महिन्यापासून नगरसेवकांचं मानधन आणि कर्मचाऱ्याचं वेतन थांबवलं जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयावर सभागृहानं सहमती दर्शवली. या निर्णयामुळं राज्यातील महापालिकांना एक चांगला संदेश जाईल, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केलाय.
गतवर्षी चंद्रपूर शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळं रेन वॉटर हार्वेस्टिंग कार्यक्रम हाती घेतला गेला. यासाठी लोकांना अडीच हजार रुपयांचं अनुदान देण्यात आलं. आता आपल्याच नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना सक्ती करून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न महापालिकेनं केलाय



























































