यंदाच्या वर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले. पाऊसही चांगला पडला. मात्र यंदा पाऊस थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर किंवा त्यानंतरही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ला-निना हवामान प्रणालीमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचे प्रस्थान होण्यास विलंब होणार आहे. पावसाचा मुक्काम वाढल्यास शेतीवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका आणि कडधान्यांची कापणी सप्टेंबरच्या मध्यात होते. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर कापणी करणे कठीण होईल. मात्र हिवाळ्यात पेरलेल्या पिकाला फायदा होईल, अशी हवामान खात्याच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी माहिती दिली. हवामानाची स्थिती अशीच राहिल्यास शेतमालाच्या निर्यातीतही अडचणी निर्माण होतील.
जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात सात टक्के अधिक पाऊस झाला. काही राज्यांमध्ये, सरासरीपेक्षा 66 टक्के अधिक पाऊस पडला. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाल्यास उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांवर परिणाम होणार आहे. खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे.