दिलीपकुमार, राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांमध्ये साकारणार म्युझियम; पाकिस्तान सरकारच्या हालचाली सुरू

बॉलिवूडमधील दोन महान कलाकार राज कपूर आणि दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित घरे पाकिस्तानात आहेत. या घरांची अवस्था चांगली नाही. त्यामुळे या हवेलींसारख्या घरांचे जतन व्हावे, अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता या घरांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तान सरकार पुढे सरसावले आहे. या घरांमध्ये म्युझियम उभे करण्याचे पाकिस्तान सरकारने ठरवले आहे. त्यानुसार सध्याच्या घरमालकांना शेवटची नोटीस पाठवून डेडलाईन दिली आहे.

पेशावरचे डेप्युटी कमिशनर खालिद मेहमूद यांनी बुधवारी सध्याच्या घरमालकांना नोटीस पाठवली. 18 मेपर्यंत सरकारने निश्चित केलेल्या किमतीवर आधारित रिझर्वेशन जमा करण्यास सांगितले आहे.

किमतीवरून नाराजी

याआधी खैबर पख्तनूख्वा सरकारने राज कपूर यांचे सहा मजली आणि दिलीप कुमार यांचे चार मजली घर अनुक्रमे दीड कोटी आणि 80 लाख रुपये देऊन खरेदी करायचे ठरवले होते. मात्र या घरांना सध्याच्या बाजारभावानुसार, अनुक्रमे 20 कोटी आणि साडेतीन कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी सध्याच्या घरमालकांनी केली होती.

2005च्या भूकंपानंतर हानी

राज कपूर यांचे घर म्हणजे 100 वर्षे जुनी 40 ते 50 खोल्यांची ही शानदार पाच मजली इमारत आहे. मात्र सध्या त्याचा चौथा आणि पाचवा मजला ढासळला आहे. इमारत जीर्ण झालीय. राज कपूर यांच्या हवेलीत तर फाळणीपूर्वी लग्नाच्या पाटर्य़ा व्हायच्या. हवेलीच्या बुकिंगसाठी सहा महिन्यांचे वेटिंग असायचे. भूकंपामुळे हवेलीची अवस्था खूपच वाईट झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या