दुबार मतदारांना सरळ फोडून काढा! राज ठाकरे यांचा संताप

मतदार याद्यांमधील घोळांबाबत केवळ विरोधी पक्षच बोलतो आहे असे नाही, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही बोलताहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाकडूनही मतदार यादीतील गोंधळाचे पुरावे जाहीर केले जाताहेत. त्यामुळे आता घराघरात जाऊन मतदार याद्या तपासण्याची जबाबदारी सगळय़ांची आहे. यादी आणि घरातील व्यक्तीचा चेहरा तपासला पाहिजे. मतदानाच्या दिवशी असे दुबार मतदार आढळले तर त्यांना सरळ फोडून काढा, बडव बडव बडवल्यानंतरच त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असा संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मतदार याद्यांमधील घोळ उघड करताना त्यांनी दुबार मतदारांच्या नावे असलेले गठ्ठेच्या गठ्ठेच समोर ठेवले. एक टेंपो भरेल इतके हे गठ्ठे होते. मुंबई, कल्याणसह महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातील दुबार मतदारांची मतदारनिहाय संख्याच राज ठाकरे यांनी वाचून दाखविली. ‘सारखे पुरावे मागता ना? मग हे गठ्ठेच घ्या, असे सांगतानाच, ‘कार्यकर्त्यांनी आतापासूनच मतदार याद्यांवर काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी यावेळी साडेचार हजार बोगस मतदारांची यादी दाखविली. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधील हे मतदार आहेत. या मतदारांनी त्यांच्या मूळ ठिकाणी मतदान केले आहेच, पण मलबार हिल मतदारसंघातही मतदान केल्याचा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला. अशा निवडणुकांतून लोकशाही टिकेल का, असा सवालही त्यांनी केला.

…हा तर मतदारांचा अपमान

आमदाराचा भाऊच म्हणतो की, मी वीस हजार मते बाहेरून आणली. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरही मतदार नोंदविले गेल्याचे समोर आले आहे. 2017 पासून मी हेच ओरडून सांगतोय. यादीतील घोळ हा उन्हातान्हात उभे राहून मतदान करणाऱया मतदारांचा अपमान नाही का, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

निवडणूक आयोगाची तिरडी काढली

मतचोरी करून भाजपला सत्तेत बसविणाऱ्या निवडणूक आयोगाची संतप्त मोर्चेकरांनी तिरडी काढली. भाजप हाय हाय, निवडणूक आयोग हाय हाय… असा आक्रोश करत मोर्चेकऱयांनी आपला निषेध व्यक्त केला.