स्वातंत्र्यदिनी लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही? राज ठाकरे यांचा सवाल

कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये, हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत. एका बाजूला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही, असा संतप्त सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 15 ऑगस्टला मांस विक्री बंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला.

याबाबतचा कायदा 1988 साली आणल्याचे मी ऐकले. कायदा कधीही आणला असला तरी स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.  कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावे लागेल.कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे. बंदी असतानाही जर धर्माच्या नावाखाली कबुतरांना खाद्य दिले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.  मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मी 2016-2017 सालापासून बोलतोय. बाकीचे आता बोलायला लागलेत, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेतील मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे. आमचे लोकही मतदार याद्यांची तपासणी करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.