राजामौली बनवणार दादासाहेब फाळके यांच्यावर बायोपिक

बाहुबली आणि आरआरआर या चित्रपटाच्या तुफान यशानंतर राजामौली यांचा आगामी चित्रपट कोणता असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आता ही उत्सुकता संपली आहे. नुकतीच राजामौली यांनी एक्सवर आपल्या आगामी ‘मेड इन इंडिया’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे.

कॅप्शनमध्ये राजामौली यांनी म्हटलंय, “जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाची कहाणी ऐकली तेव्हा मी भावुक झालो होतो. खरंतर बायोपिक करणे हे खूप अवघड काम असते. पण हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक यांच्यावर बायोपिक करणे त्याहूनही आव्हानात्मक आहे.’’ राजामौली यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन कक्कड सांभाळणार आहेत. मराठीसह हिंदी, तमीळ, तेलगु, कन्नड आणि मळ्याळम भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होईल.