
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून वाढता ओघ पाहून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आता निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून भविष्यातील निवडणुकीचा धोका लक्षात घेऊन सामंत हे अधिकारांचा वापर करीत शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याना त्रास देत आहेत. असा आरोप शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी केला असून यापुढे असेच चालू राहिल्यास खासदार विनायक राऊत व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन जशास तसे उत्तर देऊ असे आमदार राजन साळवी यांनी ठणकावले आहे.
राजन साळवी पुढे म्हणाले, जिल्हा व तालुकापातळीपर्यत शिंदे गटात पदाधिकारी जात नसल्याने त्यांना त्रास देण्याचा प्रकार रत्नागिरीत सुरु आहे. रत्नागिरीतील चिरेखाण मालक, ठेकेदार व अन्य व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत असल्याचा आरोपही साळवी यांनी केला. जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यामध्ये जास्तीतजास्त ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकेल असा विश्वासही साळवी यांनी व्यक्त केला आहे.




























































