मिंध्यांनी गुरू बदलला म्हणून दिल्ली गाठावी लागली; राजन विचारे यांची टीका, शक्तिस्थळावर धर्मवीरांना शिवसैनिकांची गुरुवंदना

आमचे गुरू ‘मातोश्री’ व ठाण्यात आहेत. मात्र सत्ता आणि केलेली कुकर्म लपवण्यासाठी गद्दार मिंध्यांनी आपला गुरू बदलला आहे. त्यामुळेच त्यांना आता दिल्ली गाठावी लागत आहे, अशी जोरदार टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी केली. टेंभी नाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करतानाच शक्तीस्थळावर जाऊन शिवसैनिकांनी वंदन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजन विचारे यांनी मिंध्यांची सालटी काढली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदेंनी अचानक दिल्ली गाठल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पत्रकारांनी राजन विचारे यांना विचारले असता त्यांनी मिंधे गटावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख, धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. मराठी माणसांवर अन्याय झाल्यानंतर कसे पेटून उठायचे हे या दोन नेत्यांनीच आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे या दोन गुरूंचे विचार घेऊन पुढे जात आहोत. मात्र मिंध्यांना आता गुरूच्या दर्शनासाठी दिल्लीवारी करावी लागत आहे, असा टोलाही राजन विचारे यांनी लगावला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, शहर समन्वयक संजय तरे, माजी परिवहन सदस्य राजू महाडिक, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, माजी शिक्षण मंडळ सदस्य व्यंकट कांबळे, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या उषा बोरुडे, अनुजा पांजरी, विद्या कदम आदी उपस्थित होते.

अधिवेशन सोडून शिंदेंची रातोरात दिल्लीकडे धाव; मिटवामिटवीसाठी गाठीभेटी, पटवापटवी

बिहार जिंकण्यासाठीच हिंदी सक्तीचा डाव

मागील निवडणुकीमध्ये अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूचे भांडवल करून हिंदी भाषिकांची दिशाभूल करण्यात आली. आता महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करून बिहारच्या निवडणुका भाजपवाल्यांना जिंकायच्या आहेत, असा आरोप राजन विचारे यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आल्याने भाजप व मिंध्यांची तंतरली आहे. त्यामुळेच ते आगपाखड करत असल्याचेही त्यांनी सांगितले.